म्हसवड : म्हसवड नगरपरिषदेमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणुन कार्यरत असलेला गणेश मधुकर म्हेत्रे याने आपल्या वाढदिनानिमीत्त म्हसवड शहरातील सर्व व्यावसायिक व छोटे भाजी विक्रेते यासह पोलिस, आरोग्य, व सफाई कर्मचारी यांना मोफत मास्कचे वाटप करीत अनोख्या पध्दतीने साजरा करुन सामाजीक बांधिलकी जोपासली.
माण तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असले तरी म्हसवड शहरात मात्र कोरोना रुग्णाचे प्रमाण जवळपास शुन्य असे आहे. मात्र म्हसवड पालिकेने खबरदारी म्हणुन शहराचा आठवडा बाजार बंद केला आहे. तर पालिका प्रशासन व पोलिस यांनी संयुक्त मोहीम राबवत शहरात “नो मास्क नो एंट्रीची” मोहिम सुरु केली आहे. यामुळे शहरातील सर्व व्यवहार व बाजारपेठेत आजवर सुरळीतपणे सुरु असुन ती यापुढेही कायम सुरळीत रहावी यासाठी पालिकेतील कंत्राटी कर्मचारी असलेल्या गणेश म्हेत्रे याने एक पाऊल पुढे टाकीत शहरात सर्वांना मोफत मास्कचे वाटप करीत असुन प्रत्येकाला मास्क वापरण्याची तो विनंती करीत आहे.
गणेश म्हेत्रे हा खरे तर पालिकेतील एक कंत्राटी कर्मचारी असला तरी सध्या तो पालिकेसह सर्व म्हसवडकरांचा आवडता बनला आहे. कोणाचेही व कोणतेही काम असो त्या कामाचा श्रीगणेशा नेहमी गणेशच करीत आला आहे. गत जवळपास १ वर्षापासुन हा गणेश शहरात पायी फिरुन गळ्यात स्पिकर अडकावुन लोकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करीत आहे. कोरोना काळातील त्याचे सामाजिक काम पाहुनच त्याला काही सामाजिक संघटनांनी कोरोना योध्दा म्हणुनही त्याचा गौरव केला आहे. अशा या खऱ्या-खुर्या कोरोना योध्द्याने आपली आर्थिक परिस्थिती नसताना देखील आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील फेरीवाले, भाजीवाले, व्यावसायिक, पोलीस, आरोग्य, सफाई कर्मचारी व म्हसवडकर नागरीक आदींना मोफत मास्कचे वाटप करीत असुन सर्वांना हात जोडुन मास्कचा वापर करण्याची विनंती करीत आहे.
गणेश नामक या अवलियाच्या या उपक्रमाचा आदर्श घेवुन शहरातील बड्या वर्गाने यापुढील काळात कोरोना योध्द्यांसाठी किहीतरी करुन त्यांचाही गौरव करावा एवढीच त्याच्या वाढदिवसानिमित्ताने अपेक्षा.