नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. तर भाजपाचे कर्नाटकातील कृषी मंत्री बी.सी. पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. जे शेतकरी आत्महत्या करून स्वतःच आयुष्य संपवतात, ते मनाने कुमकुवत असतात. त्यासाठी सरकारला दोष देता येणार नाही, असं विधान पाटील यांनी केलं आहे. पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे वादंग होण्याची शक्यता आहे.
ते मैसूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्यावर भाष्य करताना हे विधान केलं. “शेतकऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या या टोकाच्या निर्णयाला सरकारची धोरणं कारणीभूत नाहीत. फक्त शेतकरीच नाही, तर उद्योजकही आत्महत्या करून जीवन संपवतात. सर्वच आत्महत्यांना शेतकरी आत्महत्या म्हणू शकत नाही,” कृषी मंत्री पाटील म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी असंच एक विधान केलं होतं. “जे शेतकरी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विचार न करता, आपलं आयुष्य संपवतात, ते घाबरट असतात. आत्महत्या करणारे शेतकरी भेकड असतात. पत्नी आणि मुलांचा सांभाळ करू न शकणारे भेकड असतात. तेच आत्महत्या करतात. जर आपण पाण्यात पडलो आहोत, तर आपल्या पोहायला आणि जिंकणं शिकायला हवं,” असं विधान पाटील यांनी केलं होतं.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
