म्हसवड/अहमद मुल्ला : माण तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पिक विमा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार भत्ता तातडीने मिळावा अन्यथा गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी म्हसवड येथे सहा गावच्या शेतकऱ्याचा रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
माण च्या तहसिलदार सौ.बी.एस.माने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, शेनवडी, काळचौंडी शेतकऱ्यांचे मागील वर्षी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. शासकिय पातळीवर पंचनामेही करण्यात आले. पण अद्याप परिसरातील कोणत्याच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी भरलेला पिक विमाही मिळालेला नाही. नियमितपणे कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर भत्ता ५० हजार देण्याचे शासनाने जाहिर केले असताना आजपर्यंत पैसे जमा झाले नाहीत.
मार्च महिन्याच्या अखेरीस सोसायटीच्या नियमानुसार कर्ज नियमित करायचे आहे. तत्पूर्वी वरील प्रमाणे सर्व मागण्याचा विचार करुन लवकरात लवकर वरकुटे मलवडी पंचक्रोशितील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई, पिक विमा आणी प्रोत्साहनपर भत्त्याची रक्कम जमा करावी अन्यथा नाइलाजास्तव गुरुवार दि २५ रोजी पंचक्रोशितील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने म्हसवड येथे सातारा पंढरपूर रस्त्यावर सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस