मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांना निलंबित करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली. त्यानंतर विरोधी आमदारांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन सभागृह दणाणून सोडले. तेव्हा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक प्रकरणाचा दाखला देत भाजपवर प्रतिहल्ला केला.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबलं. ठाकरे सरकारने याप्रकरणाची चौकशी सुरु केल्यानंतर सचिन वाझे यांच्याकडे तपास देण्यात आला होता. त्यांनी अर्णव गोस्वामीला घरातून उचलून आणले. त्यामुळे आता सचिन वाझे पदावर कायम राहिले तर यांना बेड्या पडतील, या भीतीने विरोधक सचिन वाझे यांना लक्ष्य करत आहेत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.
अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. ही गोष्ट भास्कर जाधव यांना माहिती नसेल. तुम्ही मला धमक्या देऊ नका. मी धमक्यांना घाबरत नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी महाविकासआघाडीची कोंडी झाली आहे.उपलब्ध पुरावे हे सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना बडतर्फ करून त्यांचा तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
तर, “अर्णब गोस्वामीला सचिन वाझेनं घरातून उचलून आणलं आणि म्हणून यांना दुःख होतंय. त्याचबरोबर न्यायाधीश लोढा यांची नागपुरात हत्या झाली, ही हत्या का झाली? हे देखील त्यांनी सांगितलं पाहिजे. सचिन वाझे हा जर तपास अधिकारी राहिला तर यांचे बिंगं फुटेल. यांना बेड्या पडतील, म्हणून ते सचिन वाझेच्या मागे लागले आहेत. माझी सरकारला विनंती आहे की, सचिन वाझेला हटवू नका, यांची चौकशी करा.” असं देखील भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं.
यावर “देवंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक आत्महत्येचे प्रकरण दाबलं. त्याची आम्हाला चौकशी करायची आहे.” असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस