सांगली : आदिवासींची विशेष पदभरती करण्याची मागणी बिरसा क्रांती दल तसेच इतर आदिवासी संघटना, आदिवासी सुशिक्षित बेरोजगार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, मुख्य सचिव यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र. ८९२८/२०१५ व इतर याचिका यामध्ये दिनांक ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व तद्अनुषंगाने मा.उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी दिलेल्या आदेशान्वये राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दि. २१ डिसेंबर २०१९ निर्गमित करुन बिगर आदिवासींनी, आदिवासींच्या बळकावलेल्या राखीव जागा रिक्त करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दिलेली होती. आणि रिक्त होणारी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची पदे अनुसुचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र धारक उमेदवारांमधून सेवाप्रवेश नियमानुसार विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन भरण्यासाठी, कालबद्ध कार्यक्रम आखून पदे भरण्याची कार्यवाही करण्याचे राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांना व खुद्द त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यालयांना आदेशित केले होते.
विशेष पदभरतीच्या कालबद्ध कार्यक्रमाची मुदत संपूर्ण संपून गेली तरी १२५०० रिक्त पदांपैकी फक्त २८ पदे भरण्यात आली. उर्वरित पदांविषयी जाहीरातीही काढण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे रिक्त झालेल्या आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा कालबद्ध कार्यक्रम आखून दिल्यावरही भरण्यात आलेल्या नाहीत. स्वाभाविकपणे आदिवासी समाजाची दिशाभूल होऊन फसवणूक झाली.
आदिवासी समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. समाजातील उच्च शिक्षीत युवक/युवती घटनात्मक हक्काच्याही राखीव जागा मिळत नसल्यामुळे निराशेच्या गर्तेत आहे. कसेबसे पोटभरण्यासाठी जीवाचे रान करुन पायपीट करीत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आता तरी बिगर आदिवासींनी हडपलेली राज्यातील सर्व विभागातील आदिवासींच्या राखीव जागा तात्काळ भरण्यात याव्यात.
अन्यथा,सुशिक्षित बेरोजगार, बिरसा क्रांती दल इतर आदिवासी संघटना तीव्र आंदोलन छेडेल.
“आदिवासींची विशेष पदभरती मुदत संपून एक वर्ष लोटले तरी आदिवासींचे १२,५०० पदे भरली नाही. यासाठी १९ फेब्रुवारीपासून मंत्रालयात सुशिक्षित बेरोजगार आणि आदिवासी संघटना मार्फत निवेदने पाठविण्यास सुरवात झाली आहे. शासनाला जागे करण्यासठी १२,००० निवेदने पाठवली जाणार आहे.यानंतर ही भरतीमोहीम राबवली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू”
– राजेंद्र पाडवी,बिरसा क्रांती दल