मुंबई : अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी सोमवारी राज्याच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. महिनाभरातच महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. या राजीनाम्यानंतर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
महाजन यांनी ट्विटरवरुन अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. महाजन यांनी एकूण पाच ट्विट केली आहे. “राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरूवात असून पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?,” असं महाजन यांनी आपल्या पहिल्याच ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पुढील ट्विटमध्ये देशमुख यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता असंही महानज म्हणालेत. “एका एपीआयला १०० कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. भाजपाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी ही मागणी केली होती,” असं महाजन म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस