नवी दिल्ली : दिल्लीत असलेल्या इस्रायली दूतावासाजवळ कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून, परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कॅब दिसून आली आहे. या कॅबने दोन लोकांना घटनास्थळी सोडलं होतं. त्यानंतर कॅब निघून गेल्याचं दिसत आहे.
कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, तिथे पायी जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. सीसीटीव्ही ही माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून, दोन्ही व्यक्तींची स्केच तयार केली जात आहे.
बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांना बरंच साहित्य मिळालं असून, यात एक लिफाफा सापडला. लिफाफ्यात एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे.’ असा इशारा देणारा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चिठ्ठीत इराण लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ मोहसीन फखरजादेह यांच्या नावांचा शहीद असा उल्लेख करण्यात आलेला आहे. दोघांचीही गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. बगदाद विमानतळाजवळ कासीम सुलेमानी यांची ड्रोन हल्ला करून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी इस्रायलमधील एक पथकही भारतात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
