आटपाडी : भाजप प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार फंडातून घेण्यात आलेल्या ३ रुग्ण वाहिकांचा लोकार्पण सोहळा राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल, जयवंत सरगर यांच्या बरोबर भाजपचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोरोना कालावधीमध्ये आटपाडी व खानापूर तालुक्यामध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने अनेक रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नव्हत्या. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या आमदार फंडातील पहिला निधी हा रुग्णसेवेसाठी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत विटा, खरसुंडी, आटपाडी या रुग्णालयांना ऑक्सिजन सहित रुग्णवाहिकासाठी प्रत्येकी १७ लाख रुपये याप्रमाणे ५१ लाख रुपये मंजूर करण्याचे पत्र जिल्हाधिकारी सांगली यांना दिले होते.
त्यानुसार आज या तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे केले. आमदार पडळकर यांनी दिलेल्या या रुग्णवाहिकेमुळे मतदार संघातील आरोग्याचा प्रश्न काहीप्रमाणात निकाली निघणार आहे.



