सांगली : कोविड-19 च्या लसीकरणाची प्रक्रिया 16 जानेवारी पासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात सुरूवातीला 9 केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात साधारणत: 31 हजार 800 डोस लसीकरणासाठी प्राप्त झाले असून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मनात कोणतीही भिती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
लसीकरण मोहिमेबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिलहाधिकारी कार्यालयात माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, लसीकरण समन्वयक अधिकारी डॉ. विवेक पाटील यांची उपस्थिती होती.
कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. यासाठी सांगली शहर व ग्रामीण भागात शासकीय 8959 तर खाजगी 4395 अशा एकूण 13 हजार 354 आरोग्य कर्मचाऱ्यांची तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 5 हजार 777 शासकीय तर 7 हजार 361 खाजगी अशा एकूण 13 हजार 138 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील 26 हजार 492 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. यासाठी 92 शितसाखळी केंद्रे असून 140 आयएलआर व 126 डीप फ्रीजर उपलब्ध आहेत. सांगली ग्रामीण व शहरी भागासाठी 362 लस टोचक असून 75 AEFI किट उपलब्ध आहेत. महानगरपालिका क्षेत्रात 72 लस टोचक असून 21 AEFI किट उपलब्ध आहेत.
लसीकरणासंबंधी प्रशिक्षण घेण्यात आले असून मोहिमेच्या पूर्व तयारीची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. प्रत्यक्ष लसीकरणासाठी जिल्ह्यास 31 हजार 830 डोसेस (3183 व्हायल) प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात ज्या 9 ठिकाणी 16 जानेवारी रोजी लसीकरण होणार आहे त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कवलापूर, ग्रामीण रूग्णालय पलूस, उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर, उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ, शहरी आरोग्य केंद्र हनुमाननगर, सांगली, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली, मिरज वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय मिरज, भारती हॉस्पीटल सांगली, वॉनलेस हॉस्पीटल मिरज यांचा समावेश आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
