मुंबई : 16 जानेवारीपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. मात्र कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आल्याने राज्यातील अनेक ठिकाणी लसीकरण मोहिम 2 दिवस थांबविण्यात आली होती.आता आजपासून पुन्हा लसीकरण सुरू होणार आहे.
आता आठवड्यातील 4 दिवस कोरोना लसीकरण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.
आठवड्यातील चार दिवस राज्यातील 285 केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरेंनी केले.
लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. ह्या ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घ्यावी. जेणेकरुन समाजामध्ये सकारात्मक संदेश जाण्यास मदत होईल. त्यामुळे लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, असेही ते म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
