आटपाडी : आटपाडी तालुक्यातील प्रलंबित असणाऱ्या फेरफार, बँक बोजा कमी करणे, नोंदीबाबत आटपाडी तालुक्यात १५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान मोहीम सुरु करण्यात आली असून या मोहिमेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन तहसिलदार सचिन मुळीक यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील परिपत्रक क्र. साशा/प्रशा-2/आरआर/184/2021 दिनांक- 08.02.2021 अन्वये नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार नोंदीसाठी प्रलंबित असलेल्या ऑफलाईन अर्जाचे (दस्त, वारस, कर्ज बोजा, साठेखत इ. ) निर्गतीसाठी दि 15 फेब्रुवारी 2021 ते 15.मार्च 2021 कालावधीत तहसिल कार्यालयामध्ये स्विकारून सदर प्राप्त अर्जावर अंतिम कार्यवाही होणार आहे. यासाठी एक विशेष मोहीम घेणेकामी म्यूटेशन कक्ष तहसिल कार्यालय आटपाडी येथे स्थापन करणेत आला आहे.
तरी आटपाडी तालुक्यातील शेतकरी खातेदारांनी त्यांचे बॅक बोजा नोंद करणे, बॅक बोजा कमी करणे, वारस नोंद करणे, खरेदी वा इतर आदेशाच्या प्रलंबित असलेल्या नोंदी, सदर मोहीमेमध्ये आवश्यक त्या दस्तऐवज, पुराव्यासह उपस्थित राहून अर्ज दाखल करणेत यावेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करणेत येत आहे.
तसेच आठवड्यातील प्रत्येक बुधवारी संगणीकृत सातबारा मधील चुका दुरुस्त करण्यासाठी कॅम्प घेणेत येणार आहे. सदर कॅम्प मध्ये 7/12 दुरुस्तीसाठी अर्ज स्वीकारणे, जुना हस्तलिखीत अभिलेखांवरून खात्री करणे, तलाठी यांनी म.ज.म.अधि.1966 चे कलम 155 चे ऑनलाईन प्रस्ताव सादर करणे इ. कामे होणार आहेत. तरी याचाही लाभ शेतकरी खातेदार यांनी घ्यावा असे प्रशासनाच्या वतीने तहसिलदार सचिन मुळीक यांनी केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस