नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. नागपूरमध्ये आले असता पालिका निडवणुकीतील आघाडीवरून त्यांना विचारलं असता त्यांनी काँग्रेसला टोले लगावले.
आघाडीच्या माध्यमातूनच पालिकेची निवडणूक लढवली जावी अशी आमची मागणी आहे. महाविकास आघाडीतील मित्रांशी बोलून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. पण आमचाच पक्ष मोठा असं म्हटलं तर अडचणी येऊ शकतात, असा टोला पाटील यांनी काँग्रेसला लगावला.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत आघाडी करुन लढायचे की स्वबळावर लढायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल. यावेळी सर्व पक्षांनी एकत्रित ताकद लावली तर नागपूर जिल्हा परिषदेप्रमाणे नागपूर महानगरपालिकेत देखील परिवर्तन होऊ शकतं, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने अलिकडे केलेल्या घोषणा फलद्रूप झालेल्या नाहीत. घोषणा केल्या पण त्याचे पैसेच पोहोचले नाहीत. केंद्र सरकारने राज्य सरकारचे जीएसटीचे 27 हजार कोटी रुपये द्यावेत. नंतरच नव्या घोषणा कराव्यात. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा करू नयेत, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
