मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडून सुरू असलेल्या चौकशीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परदेशी बँक खात्यांमध्ये पैसे वळवून फेमा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले, अशा आरोपाखाली भोसलेंची चौकशी सुरू आहे. त्यांच्या याचिकांवर शुक्रवारी प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने चौकशी थांबवण्यास नकार देतानाच पुढील सुनावणी सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.
‘ईडी’ने समन्स बजावण्यापूर्वी व कार्यालयावर छापा टाकण्यापूर्वी आरोपांविषयी कोणतेही कारण दिले नाही. तपासात संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवूनही ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने कारवाई केली. त्यामुळे याचिकांवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यास मनाई करावी’, अशी विनंती भोसले पितापुत्रातर्फे ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते व अशोक मुंदरगी यांनी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाला ‘व्हीसी’ सुनावणीत केली.
याचिकांमधील आरोपांना उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत द्यावी, अशी विनंती ‘ईडी’तर्फे अॅड. हितेन वेणेगावकर यांनी दिली. तोपर्यंत कठोर कारवाई होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर ‘ईडी’ची चौकशी थांबवण्यास नकार देतानाच खंडपीठाने याविषयीची सुनावणी सोमवारी ठेवली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
