मुंबई: दिल्लीत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा भागात इस्रायलच्या दूतावासापासून अगदी जवळ आयईडी स्फोट घडवून आणण्यात आल्याने सर्व यंत्रणा हादरल्या आहेत. या घटनेनंतर संपूर्ण स्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारीक लक्ष ठेवून आहेत. खबरदारी म्हणून दिल्ली आणि मुंबई विमानतळ तसेच सर्व प्रमुख ठिकाणी सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.
दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारनेही अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. विशेषत: मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही उणीव राहू नये, यासाठी खबरदारी बाळगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी चर्चा केली व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. याबाबत अजित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली. राज्यातील जननेतेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
सरकारच्या सूचनांनुसार मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात अॅलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी बंदोबस्त वाढण्यात आला आहे, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानेही सर्व विमानतळे, महत्त्वाची आस्थापने आणि शासकीय इमारतींसाठी अॅलर्ट जारी केला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
