मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले. शहा यांनी थेट शब्दांत ही भेट झाली नसल्याचेही अमान्य केले नाही, यावरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.
शरद पवार यांच्याभोवती संभ्रमाचे वातावरण निर्माण करायचे व गुळाची ढेप वितळवून टाकायची, असे भाजपचे षड्यंत्र असेल तर ते मूर्खांच्याच नंदनवनात फिरत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार उत्तम गतीने व नीतीने चालले आहे. शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत.
महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यांत भाजपविरोधी आघाडीस बळ देण्याची शर्थ पवार साहेब करीत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या पवार साहेब थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतीलच. भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे, अशी अपेक्षा ‘सामना’च्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस