नवी दिल्ली : सिंघू सीमेवर सुमारे दोनशे जणांच्या जमावाने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या मोठय़ा फौजफाटय़ातही शेतकऱ्यांवर दगडफेक आणि मारहाण केली. त्यांच्या तंबूंची मोडतोड केली. त्यामुळे आंदोलनस्थळी शुक्रवारी दिवसभर तणाव निर्माण झाला होता.
सिंघू सीमेवरही पोलिसांनी कारवाई केल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान याच गोंधळादरम्यान भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी रात्री एक खळबळजनक दावा केला आहे. टिकैत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
टिकैत यांनी शुक्रवारी रात्री ट्विटरवरुन अनेक भाजपा नेते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. “मला आज अनेक भाजपा नेत्यांचे फोन आले. त्यांनी आम्ही सुद्धा राजीनामा देत आहोत असं मला सांगितलं आहे. पक्षात राहून अशाप्रकारे आम्ही शेतकऱ्यांचा अपमान पाहू शकत नाही. अजूनही आम्ही गप्प राहिलो तर येणारी पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही, असं हे नेते म्हणाले,” असं ट्विट टिकैत यांनी केलं आहे.
टिकैत यांनी शनिवारी सकाळीही एक ट्विट केलं असून मोठ्याप्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर पुन्हा जमा होण्यासाठी निघाले असल्याचं म्हटलं आहे. “आज सकाळपासूनच गावांमधून ट्रॅक्टर निघण्यास सुरुवात झालीय. गाझीपूर सीमेवर आज कालपेक्षा अधिक शेतकरी पोहचणार आहेत,” असं टिकैत यांनी म्हटलं आहे.
मी आंदोलन गुंडाळून निघून जाऊ शकलो असतो किंवा स्वत:ला अटकही करून घेतली असती पण, तसे केले असते तर, शेतकऱ्यांवर देशद्रोहाचा डाग लागला असता, तो कधीही पुसला गेला नसता आणि हेच मला मान्य नाही. आंदोलनाविरोधात षडयंत्र रचले असून आता मी जीव गेला तरी हटणार नाही, असे टिकैत यांनी शुक्रवारी दिलेल्या भाषणात म्हटलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
