अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या यांना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अलिबागमध्ये किरीट सोमय्या आंदोलन करत असताना पोलिसाकडून ही कारवाई करण्यात आली. किरीट सोमय्या हे उद्धव ठाकरे यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी करत होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
अन्वय नाईक यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराने रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्या. पण या जमिनींवरील मालमत्ता २०२० पर्यंत आपल्या नावावर केल्या नाहीत. त्यांनी बेनामी मालमत्ता म्हणून सहा वर्ष वापरली. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही जमिनीवरील १९ मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करा या मागणीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत होते. यावेळी पोलीस मुख्यालयाकडे जाणारा रस्ता त्यांनी अडवून धरला होता. रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

किरीट सोमय्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. जमीन व्यवहाराची चौकशी करा अशी मागणी करत त्यांनी निदर्शनाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयात नंतर जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. पण पाच जणांनाच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेता येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले. पण जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व कार्यकर्त्यांना घेऊनच जाणार यासाठी सोमय्या आग्रही होते. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा काही कार्यकर्त्यांनी बळजबरीने प्रयत्न केला. पण तो पोलिसांनी हाणून पाडला.
त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर मधोमध ठिय्या मांडून धरणे आंदोलनाला सुरवात केली. त्यांनी पोलीस मुख्यालयाकडे जाणारा रस्ता अडवून धरला. पण पोलिसांनी संयम राखत आंदोलन करण्याची त्यांना मुभा दिली. आंदोलनाची व्याप्ती दुपारनंतर वाढत गेली. सुरुवातीला मोजक्या कार्यकर्त्यांसह हे आंदोलन सुरु करण्यात आले होते. पण नंतर जिल्ह्यातील विविध भागातून भाजप कार्यकर्ते आंदोलनासाठी दाखल होत गेले. रात्री आठ वाजता पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
