मुंबई : अँटिलिया स्फोटकं प्रकरणात अटक झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी 50 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले असून, त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
जे बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, की सचिन वाझेंनी केलेले आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्यासाठीच हे आरोप करण्यात आले आहेत, असे म्हणत अनिल परब यांनी सर्व आरोप नाकारले आहेत.
अनिल परब म्हणाले की, सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांशी माझा काहीएक संबंध नसून माझी, मुख्यमंत्र्यांची तसंच सरकारची बदनामी करण्यासाठी हे आरोप करण्यात येत आहेत. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असून नार्को टेस्ट देण्याचीही माझी तयारी आहे.
सचिन वाझेंचे आरोप आहेत की जून आणि जानेवारीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं. मग इतक्या दिवसांमध्ये त्यांनी यावर काहीही सांगितलं नाही. परमबीर सिंग यांच्याही पत्रामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. पण मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे हा एका धोरणाचा भाग आहे. यातून सरकारला बदनाम करण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. त्यामुळे एनआयए, सीबीआय, रॉ, नार्टोटिक्स अशा कोणत्याही चौकशीला सामोरा जायची माझी तयारी आहे. माझी चौकशी करावी आणि चौकशीत सत्य बाहेर येईल, असे परब म्हणाले.
SBVT च्या ट्रस्टींकडून 50 कोटी रुपये जमा करण्यास सांगितलं तसंच जानेवारी 2021 ला मी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदारांना बोलावून प्रत्येक कंत्राटदाराकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये जमा करण्यास सांगितलं, असे दोन आरोप माझ्यावर सचिन वाझे यांनी एका पत्रात केले आहेत. हे दोन्ही आरोप मी फेटाळत असल्याचे ते म्हणाले.
भाजपचे नेते आरडाओरड करत होते. या प्रकरणात आम्ही तिसरा बळी घेऊ, असं ते म्हणत होते. याचा अर्थ त्यांनी दोन-तीन दिवसांपासून हे प्रकरण शिजवलं आहे. त्यांनी सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण तयार केलं आहे. सचिन वाझे पत्र देणार हे कदाचित त्यांना माहिती होतं. त्यामुळे केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरुन त्यांनी आरोप केले आहेत. या पत्रात वाझेंनी माझ्यावर, अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचा माणूस म्हणून एकावर आरोप केले आहेत. पण त्याने केलेले दोन आरोपांशी माझा काहीच संबंध नाही.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस