म्हसवड/अहमद मुल्ला : कोरोनासारख्या विषाणूची भविष्यात निर्मिती होऊ नये यासाठी बांबूसारख्या कार्बन शोषणाऱ्या वृक्षाची लागवड करणे आवश्यक असल्याचे मत भाजपाचे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल यांनी व्यक्त केले. कोरोणापेक्षा भयानक विषाणूंची निर्मिती भविष्यात होऊन याचा फटका मानवजातीला बसण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली असून यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबद्दल पाशा पटेल यांनी म्हसवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले. यावेळी बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंचे उत्पादक संजय करपे, माण देशी फाउंडेशन व माण देशी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा उपस्थित होते.
यावेळी पाशा पटेल म्हणाले, जीवजंतू जगण्यासाठी पृथ्वीचे तापमान २ अंशाने कमी होणे गरजेचे आहे मात्र हे तापमान कमी होण्याऐवजी १.५ अंशाने वाढले आहे. तसेच इंधनाचा शोध लागण्यापूर्वी हवेतील कार्बनचे प्रमाण २८० पीपीएम इतके होते ते सन २०१९ मध्ये ४१२ पीपीएम इतके झाले. सन २०२१ मध्ये ४२२ इतके झाले. एका वर्षात हे प्रमाण १० पीपीएम वाढण्याचे कारण या वर्षात लाखो किलोमीटर ऍमेझॉनचे जंगल जाळण्यात आले. यामधून कार्बन बाहेर पडल्याने एका वर्षात हवेतील कार्बनचे प्रमाण १० पीपीएम ने वाढले. हवेमध्ये जीवजंतू जगण्यासाठी कार्बनचे प्रमाण ३५० पीपीएम पर्यंत चालू शकते.
हवेतील कार्बनचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीवरील तापमानात वाढ होते शिवाय अश्या वातावरणात जीवजंतूंना जगणे अशक्य होते व त्यामुळेच किरोना सारख्या उपद्रवी विषाणूंची वाढ झपाट्याने होते. व यातूनच महामारी येत असते. माण तालुक्यासाठी बांबू हे झाड वरदान आहे. कारण उन्हाळ्यातील येथील तापमानाचा विचार केला तर माण तालुक्यात राहणे म्हणचे नरकात राहण्यासारखे असल्याचे सांगून ही परिस्थिती बदलण्यासाठी बांबूची लागवड हा पर्याय ठरणार आहे.
बांबू च्या सुमारे १६०० प्रकारच्या जाती असून यापैकी आपल्या देशात ३५ जाती चांगल्या येतात, त्यापैकी ७ जाती आपल्या भागात वाढतात. बांबूची रोज सुमारे एक फूट इतकी वाढ होते. बांबूची लागवड केल्यानंतर तीन वर्षे याची तोड करावयाची नाही, त्यानंतर दरवर्षी तोड करता येते. एका एकरामध्ये १५ बाय १५ अंतरावर लागवड करावी लागते. यामध्ये २२० रोपांची लागवड होते. यासाठी प्रतिरोप केंद्राचे १२० तर राज्याचे २७ रुपये अनुदान मिळते. शिवाय कीटकनाशके व औषधे फवारणी करावी लागत नाही.
पाशा पटेल यांनी 20 एकर क्षेत्रावर बांबूची लागवड केली असून सुमारे ९ कोटी रुपये खर्चून टीस्यूकल्चर सुरू केले आहे. शिवाय बांबू इंजिनिअरिंग कॉलेजही सुरू केले आहे. गोमाखोरे पुनर्जीवन चळवळ सुरू केली. 20 लाख बांबू 4000 हेक्टर मध्ये लागवड करण्याचे काम सुरु आहे. बांबू लागवडीनंतर तीन वर्षांनंतर एकरी एक लाख रुपये इतके उत्पन्न मिळू लागते. बांबूपासून सुमारे १८०० प्रकारच्या विविध वस्तूंची निर्मिती होते. यामध्ये इथेनॉल निर्मिती हे प्रमुख उत्पादन आहे. इथेनॉल हे भविष्यातील इंधन आहे. शिवाय फर्निचर, लोणचे, टूथ ब्रश, तांदूळ, मुरांबा, घड्याळ, कापड यांचा समावेश आहे. नेदरलँड, फिनलँड व भारत मिळून आसाम मध्ये बांबूपासून इथेनॉल बनविण्याची ६ कोटी रुपये खर्चून रिफायनरी उभी केली असून इथे बांबूपासून रोज सुमारे ५ टन सीएनजी ची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे डिझेल व पेट्रोलसाठी दरवर्षी करावा लागणारा सुमारे सात लाख कोटी रुपये वाचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस