सांगली : सांगली जिल्ह्या मधील मिरज, जत, तासगांव, विटा, पलूस, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळा, कडेगांव, आटपाडी या तालुक्यामधील एकूण ६६ गावातील ६६ नवीन रास्त भाव दुकानांचे जाहीरनामे काढलेले आहेत. नवीन रास्त भाव धान्य दुकान परवानासाठी अर्ज करावयाचा असेल त्यांनी संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात दि. २५ मार्च २०२१ ते २४ एप्रिल २०२१ पर्यंत कार्यालयीन दिवशी व वेळेत अर्ज द्यावेत. यापूर्वी केलेल्या व मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले आहे.
शासनन निर्णयानुसार रद्द असलेली व राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची, तसेच महसूली गांव निर्मितीमुळे नवीन द्यावयाची, रास्त भाव दुकानांकरिता जाहीरनामा काढण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या प्रस्तावामधून पंचायत (ग्रामपंचायत),स्वंयसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था अधिनियम कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वंयसहायता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था, यांना प्राधान्यक्रमानुसार तसेच प्राप्त गुणांकानुसार रास्त भाव दुकान दिले जाणार आहे.
गटाची निवड करताना जेष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या, अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरीक्षण केलेल्या गटास प्राधान्य दिले जाईल. तसेच, वरील प्राधान्यक्रमानुसार रास्त भाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाव्दारे करणे आवश्यक राहील असे शासनाचे निर्देश आहेत. त्यास अनुसरून खालीलप्रमाणे नवीन रास्त भाव दुकानांचे जाहीरनामे काढण्यात आले आहेत. तरी संबंधित तालुक्यामधील पात्र व इच्छुक संस्था/ बचतगट धारकांनी याचा लाभ घ्यावा.
तालुकानिहाय एकूण जाहीरनामे व कंसात गावांची नावे पुढीलप्रमाणे.
आटपाडी – ३ (गुळेवाडी, कानकात्रेवाडी, औटेवाडी ),
तासगांव – ८ (बिरणवाडी, शिरगांव कवठे, नागेवाडी, तुरची, कुमठे, मणेराजूरी, चिंचणी, पेड )
कडेगांव – ४ (कोतीज, ढाणेवाडी, खंबाळे औंध, वांगरेठरे),
जत- १२ (साळमाळगेवाडी, बिरनाळ, बागलवाडी, निगडी खुर्द, मायथळ, सालेकेरी, पांढरेवाडी, सोनलगी, लमाणतांडा उटगी, फुलालवाडी खंडनाळ, राजोबाचीवाडी व्हसपेठ, आबाचीवाडी कोणीकोणूर)
वाळवा – १२ (खरातवाडी, गोटखिंडी, कुरळप, नरसिंहपूर, महादेववाडी, गाताडवाडी, डोंगरवाडी, देवर्डे, बिचूद, ऐतवडे खुर्द, किल्ले मच्छिंद्रगड, वाटेगांव)
खानापूर-विटा – ३ (देवनगर, रामनगर, कुसबावडे),
शिराळा – ९ (येसलेवाडी, बेरडेवाडी, भाष्टेवाडी, खुदलापूर, खेड, फकिरवाडी, कोंडाईवाडी, कुसाईवाडी, शिराळा),
पलूस – ४ (सुखवाडी, तावदरवाडी, राडेवाडी, पुणदीवाडी),
कवठेमहांकाळ – ५ (नागज, कदमवाडी, कुंडलापूर, हरोली, ढालगांव)
मिरज – ६ (लक्ष्मीवाडी, मानमोडी, नरवाड, जानराववाडी, पाटगांव, म्हैशाळ)
रास्त भाव दुकान मंजूर करताना विचारात घेण्यात येणारे निकष व अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्राच्या प्रती जोडण्याबाबतची माहिती व अर्जाचा नमुना www.sangli.nic.in या वेबसाईटवरती दिलेला आहे. तसेच, जाहीरनामा तहसिलदार कार्यालय यांच्या नोटीस बोर्डावर, पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर, संबंधित गावच्या गावचावडीवर नोटीस बोर्डावर, ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेला आहे. तरी, इच्छुक व पात्र संस्था , बचतगट यांनी आवश्यकतेनुसार विहित मुदतीत तहसिल स्तरावर अर्ज सादर करावेत. असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस