मुंबई : अभिनेता सोनू सूद हा एक ‘सराईत गुन्हेगार’ असल्याचा आरोप मुंबई महापालिकेनं केला आहे.जुहूमधल्या एका निवासी इमारतीमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून तिथं हॉटेल थाटल्याचा आरोप करत मुंबई महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटीसीला आता सोनूने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
त्यालाच उत्तर देताना पालिकेनं हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आरोप केला आहे. यात पालिकेनं स्पष्ट केलंय की सोनू सूदनं कोणताही परवाना न घेता एका निवासी इमारतीत निवासी हॉटेल सुरू करून मुंबई महापालिका कायद्याचं उल्लंघन केलं आहे. तसंच त्या इमारतीत बेकायदेशीर बदल करत एमआरटीपी कायदाही मोडला आहे.
यासाठी पालिकेच्यावतीनं त्याला वारंवार नोटीसही बजावून कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरीही त्याचा व्यवसाय सुरूच आहे तसंच एमसीझेडएमएकडनं मिळवलेल्या एनओसीतील अटीशर्तीही पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे अशा याचिकाकर्त्याला कोणताही दिलासा न देता त्यानं केलेली याचिका मोठा ‘आर्थिक दंड’ आकारून फेटाळून लावावी अशी मागणी पालिकेनं आपल्या प्रतिज्ञापत्रातून केली आहे.”जर तुम्ही स्वच्छ हातानं कोर्टात आला नसाल तर पुढे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील”, या शब्दांत हायकोर्टानं सोनू सूदला इशारा दिला आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
