माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असून विरोधक ढोंगी,लबाड आणि भ्रष्ट असून, आटपाडीच्या माजी चेअरमनना कावीळ झाल्याप्रमाणे सर्व पिवळे दिसत आहे. बोलघेवडे आटपाडीचे माजी चेअरमन हे ढोंगी, लबाड असून शिक्षकांना गोड बोलून फसवणारे भ्रष्ट नेते आहेत. अशी टीका शिक्षक बँकेचे संचालक शरद चव्हाण यांनी केले.
पुढे बोलताना शरद चव्हाण म्हणाले, शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा 24 सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने वर्षभर झोपलेले सर्व विरोधक आज जागे झालेले असून, पुन्हा थोड्या दिवसांनी ते झोपी जाणार आहेत. मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात ज्यांना सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील साध्या खुर्च्या सुद्धा बदलता आल्या नाहीत, काळानुरूप बँकेचे रूप बदलले नाही. बँकेमध्ये कोणतीही विकासाची गोष्ट न करता डिव्हिडंट मात्र शून्य आणि एक दोन टक्के देत राहिले तेच सर्व भ्रष्ट, लबाड आणि ढोंगी विरोधक शिक्षक बँकेच्या कारभारावर चुकीचे आरोप करत सुटले आहेत.
शिक्षक बँकेतील सर्व सभासद हे सुज्ञ, सुशिक्षित आणि अभ्यासू आहेत. सभासदांचे बँकेच्या कारभारावर अतिशय बारकाईने लक्ष आहे. व्याजदर कमी केल्यामुळे प्रत्येक कर्जदार सभासदाचा मोठा आर्थिक फायदा झालेला आहे. निवडणुकीनंतर सत्ता बदल झाल्यानंतर कर्ज आणि ठेवी यातील तफावत कमी झाल्याने बँकेचे आर्थिक उत्पन्न कमी होऊन सुद्धा आर्थिक बचतीचे नियोजन केल्याने यावर्षी नफ्यामध्ये वाढ झालेली दिसत आहे. ज्यांना दहा वर्षात व्याजदर कमी करता आले नाहीत, चांगला लाभांश सभासदांना देता आला नाही, मुख्य शाखा इमारत बांधकामासाठी दोन वेळा ठराव करूनही एक रुपया त्यासाठी तरतूद केली नाही ते केवळ एक वर्षामध्ये सत्ताधारी मंडळींना लाभांश आणि व्याजदरासाठी जाब विचारत आहेत आणि सभासदांना ओरडून खोटी माहिती सांगत आहे.
सत्ताधारी स्वाभिमानी मंडळाने मुख्य कर्जाचा व्याजदर कमी केला आहे. ठेवीच्या व्याज दरात वाढ केली आहे. याचा परिपाक म्हणून सभासद संख्येमध्ये 568 ने वाढली आहे. सभासदांचा शिक्षक बँकेवर विश्वास दृढ होत चाललेला आहे. इतक्या सकारात्मक गोष्टी घडत असताना आटपाडीच्या माजी चेअरमनना कावीळ झाल्याप्रमाणे सर्व पिवळे दिसत आहे. बोलघेवडे आटपाडीचे माजी चेअरमन हे ढोंगी, लबाड शिक्षकांना गोड बोलून फसवणारे भ्रष्ट नेते आहेत. येणाऱ्या काळात मागील दहा वर्षात बँकेत केलेल्या संपूर्ण भ्रष्ट कारभाराची चौकशी करून चुकीचे आर्थिक व्यवहार केलेल्यावर कठोर कारवाई करण्याचे नियोजन केल्याचे शरद चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आटपाडीच्या हेच भ्रष्ट माजी चेअरमन आपल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना लाथाळून स्वतः निमंत्रक पद स्वीकारून पुन्हा शिक्षक बँकेत प्रवेश करण्यासाठी केविलवाणी धडपड करत सुटले आहेत. येणाऱ्या 24 तारखेला स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे सत्ताधारी संचालक मंडळ अतिशय शांतपणे सभासदांच्या प्रत्येक प्रश्नास उत्तर देण्यास बांधील असून त्यासाठी विरोधकांनी सभा शांततेत पार पाडण्यास सहकार्य करावे असे आव्हान संचालक शरद चव्हाण यांनी केले. चेअरमन विनायकराव शिंदे, व्हा. चेअरमन अनिता काटे, व सर्व संचालकांच्या नियोजनातून निवडणुकीपूर्वी दिलेला जाहीरनामा 5 वर्षात 100% पूर्ण करण्यास स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ कटिबद्ध आहे हेही त्यांनी स्पष्ट केले.