माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : राज्यात गणपती आगमनाला जोरदार पाऊस होईल, असा अंदाज होता.परंतु, राज्याच्या काही भागात हलक्या सरी कोसळल्या. जोरदार पाऊसाची अपेक्षा मात्र फोल ठरली. परंतु, येत्या दोन दिवसांत पुण्यासह राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चांगल्या पावसाची आशा पल्लवीत झाल्या आहेत. २१ सप्टेंबरपासून पुण्यासह घाटमाथ्यावर आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. त्यानंतर लगेच कडक ऊन पडत असल्याने जणूकाही ऊन-पावसाचा लपंडावच सुरू आहे.
सांगली जिल्हामध्ये कमी पावसामुळे दुष्काळाचे सावट आहे. नुकतेच कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने येथील पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर देखील मोठा परिणाम झाल्याने कोयना धरणातून नदीपत्रात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली होती. परंतु ग्रामीण भागाला सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्यासह जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैशाळ या उपचा सिंचन योजना चालू असल्याने ज्या ठिकाणी हे पाणी जात आहे त्या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी, इतर भागात मात्र कोरडा दुष्काळ निर्माण झाला आहे.