प्रसिद्ध दाक्षिणात्य गायक आणि अभिनेता विजय अँटोनीची १६ वर्षीय मुलगी मीराने आज सकाळी गळफास घेत आत्महत्या केली आहे. आज पहाटे तीन वाजता राहत्या घरातच तिने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. मीरा चेन्नई येथील एका खाजगी शाळेत १२ वीच्या वर्गात शिकत होती. मीराला एक बहिणही आहे. तिचं नाव लारा असं आहे. विजय आणि पत्नी फातिमा सध्या मोठ्या धक्क्यात आहेत.
माध्यम रिपोर्ट्सनुसार, मीरा १२ वीच्या परिक्षांच्या चिंतेत होती. यामुळेच तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं आहे. पोलिस तपासणीनुसार, पहाटे ३ वाजता मीराने आपल्या बेडरुममध्ये गळफास घेतला. सकाळी विजय तिच्या खोलीत आला असता त्याने तिला पंख्याला लटकलेलं पाहिलं.
त्याने लगेच मीराला एका हाऊस स्टाफच्या मदतीने खाली उतरवलं आणि कावेरी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र मीराचं निधन झालं असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
ही घटना सर्वांसाठीच धक्कादायक आहे. संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.