माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : श्री श्री सद्गुरू साखर कारखाना, राजेवाडी ता, आटपाडी या कारखान्यातील वजन काटयावर काम करणारे काटा क्लार्क ब वाहन मालक यांनी संगणमत करून स्वताःचे आर्थिक फायदयाकरीता ऊसाने भरलेले वाहन कारखान्यात आले नसताना देखील सदर वाहनाची वजन काटयावरती स्लीप ओपन करून त्यात दुसर्याच वाहनाचे भरवजन दाखवुन उस वाहनांचे वजनात फेरफार करुन एकुण फेक ऊसाचे २७१३.३४० मे. टनाचे वजन दाखवून फेक ऊसाचे व वाहतुक, तोडणीचे बील असे एकुण ७६,७८,४२२/- रुपयांची कारखान्याची फसवणुक केली होती.
सदरबाबत श्री श्री सद्गुरू साखर कारखाना, राजेवाडी या कारखान्याचे एचआर मॅनेजर सचिन खटके यांनी आटपाडी पोलीस ठाणेत फिर्याद दिलेने आटपाडी पोलीस ठाणे येथे दि.१०.०६.२०२२ रोजी गुन्हा दाखला झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी केला आहे.
सदर गुन्हयातील आरोपींचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल तपास करून आरोपींनी कारखान्याची फसवणूक केलेल्या रखमेपैकी ६७,५६,१०६/- रूपये जप्त करण्यात आलेले होते. सदरची जप्त करण्यात आलेली रक्कम ६७,५६,१०६/- रूपये हे आज रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो आटपाडी यांचे आदेशान्वये मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम मॅडम यांचे हस्ते कारखान्याचे व्हा.चेअरमन बाळासाहेब नानासाहेब कर्णवर व सदर गुन्हयातील फिर्यादी सचिन दादा खटके यांचे ताब्यात देण्यात आली.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सांगली डॉ बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक ऑँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोहेकॉ उमर फकीर, पोकॉ प्रमोद रोडे यांनी केली आहे.