कोल्हापूर : वाकरे येथे चार दिवसांपूर्वी शाळेच्या आवारात खेळताना सापावर लहान मुलाचा पाय पडला. यामुळे भीतीने त्याला ताप भरला. तापाने मेंदूवर परिणाम झाल्याने रविवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. अर्णव नवनाथ चौगले (वय ८) असे त्याचे नाव आहे.
मिळालेली माहिती अशी, अर्णव हा गावातील खासगी इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. शाळेच्या आवारात खेळताना त्याचा सापावर पाय पडला. घरी आई-वडिलांना त्याने याची कल्पना दिली. त्याच्या शरीरावर व पायावर ओरखडाही नव्हता. यामुळे नातेवाइकांनी नि:श्वास सोडला; पण सापावर पडलेल्या पायामुळे तो भीतीने अस्वस्थ झाल्याने ताप भरू लागला होता. यामुळे त्याला कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले.
पण सर्पदंशाचे कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नसले तरी त्याचा ताप कमी होत नसल्याने नातेवाइकांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; पण तो अत्यवस्थेत गेला. रविवारी उपचारादरम्यान सायंकाळी सहा वाजता त्याचा मृत्यू झाला.