Latest Marathi News

BREAKING NEWS

 

द्राक्षे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची ५७ लाखांची फसवणूक; सांगलीतील घटना

0 569


सांगली : द्राक्ष मालाची खरेदी करून पैसे न देता द्राक्ष व्यापाऱ्याला तब्बल ५६ लाख ६७ हजार ९२० रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मारुती नामदेव टेंगले (रा. जामवाडी, सांगली) यांनी शहजाद शेख (रा. अहमदाबाद, गुजरात) आणि दिवाणजी अहमद खान (रा. आणंद, गुजरात) यांच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादी मारुती टेंगले हे द्राक्ष विक्रीचे कमिशन एजंट म्हणून काम करतात. पेठभाग, जामवाडी येथील अंजली फ्रुट सेंटर ॲण्ड सप्लायर्सद्वारे ते हा व्यवसाय करतात. गुजरात येथील संशयितांनी ए वन कंपनीच्या माध्यमातून टेंगले यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी टेंगले यांचा विश्वास संपादन केला आणि द्राक्ष मालाची खरेदी केली होती. टेंगले यांनी मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून तो संशयितांना दिला होता. माल घेतल्यानंतर त्यांनी रोखीने पैसे देणे अवघड असल्याचे सांगत त्यांना २५ लाख रुपयांचे पाच धनादेश दिले होते.

यानंतर टेंगले यांनी ५५० टन द्राक्ष खरेदी करून गुजरातमध्ये नेते होते. ज्याची किंमत एक कोटी ७८ लाख ८१ हजार ५८२ रुपये इतकी झाली होती. संशयितांनी यातील एक कोटी २४ लाख १३ हजार ६६५ रुपये परत दिले. मात्र, उर्वरित रक्कम दिली नाही. उर्वरित ५४ लाख ६७ हजार ९२० रुपये आणि कामगारांची मजुरी दोन लाख रुपये, असे ५६ लाख ६७ हजार ९२० रुपये परत मिळावेत यासाठी टेंगले प्रयत्नशील होते.

मात्र, संशयितांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुजरातमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.