भाऊ- बहिण एकमेकांसोबत कितीही भांडले तरी अडीअडचणीच्यात तेच एकमेकांच्या मदतीसाठी येतात. यामुळे भावा-बहिणीच्या नात्यातील माया काही केल्या कमी होत नाही. यात भावंडामध्ये जेव्हा वयाचा मोठा फरक असतो, तेव्हा घरातील मोठी भावंड लहान भावंडांची जबाबदारी घेतात.
भाऊ- बहिणीचे प्रेम दाखवणारी हजारो उदाहरणे आहेत, रस्त्यावर आयुष्य जगणारी मुलं हे नाते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेताना दिसतात. ते आपल्या लहान भाऊ – बहिणींची काळजी तर घेताना दिसतात पण त्यांना खाऊ घालण्यासाठी तितकीच मेहनतही घेतानाही दिसतात. अशाचप्रकारे पोटाची खळगी भरण्यासाठी एक मोठा भाऊ धाकट्या भावाला पाठीवर घेत रस्त्यावर रद्दीने भरलेली सायकल चालवताना दिसत आहे, या दोन भावांचा एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक १२ – १३ वर्षांचा मुलगा रस्त्यावर रद्दीने भरलेली सायकल ट्रॉली चालवताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी जड सायकल चालवत असताना त्याने पाठीवर धाकट्या भावाला घेतले आहे. या धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावाला अगदी घट्ट धरुन ठेवलेले दिसतेय. हा मुलगा मोठा भाऊ म्हणून आपल्या धाकड्या भावाच्या संगोपनाचे कर्तव्य, जबाबदारी पार पाडत आहे.