माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यामध्ये दूध भेसळीचा सुरू असणाऱ्या गोरख धंद्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या दुग्ध विकास अधिकारी नामदेव दवडते, अन्न सुरक्षा अधिकारी डी.एच कोळी, एस ए केदार,सी आर स्वामी, एस व्ही हिरेमठ यांचे पथकाने कारवाई करत, अनेक दूध सेंटर व चिलिंग सेंटरवर धाडी टाकत तपासणी केली. यावेळी पाच ठिकाणा मध्ये कोठेही भेसळ आढळून आली नसल्याचे अधिकारी यांनी सांगितले तर दुधाचे नमुने अन्य तपासणी साठी घेण्यात आल्याचे सांगितले.
काल दिनांक १४ रोजी अचानक पाच ठिकाणी एकाचवेळी तपासणी सुरू झाल्याने दूध भेसळीचा गोरखधंदा करणाऱ्याचे धाबे दणाणले होते.गेल्या चार ते पाच महिन्यापासून आटपाडी तालुक्यामध्ये दूध भेसळ सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याअनुषंगाने मागील चार महिन्यांपूर्वी काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.
बनपुरी येथे अन्न भेसळ विभागाने गुपचूप कारवाई करत भेसळ दूध ओतून देण्यात आले होते. तर भेसळ करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले होते. मात्र यावेळी दूध सेंटर सील करणे आवश्यक होते. व भेसळ करणाऱ्या दूध सेंटर चालकांवर गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. मात्र अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले होते.