मिरज : मिरजेत कृष्णा घाटावर कपडे धुण्यासाठी गेलेले पाच परप्रांतीय मजूर नदीत बुडाले. बचाव पथकाने यातील तिघांना वाचविले, मात्र दोघे बुडाले. एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे.
सुभाष नगर रोड, दत्त नगर येथे फरशी काम करणारे जयपूर येथील मजूर राहत आहेत. गुरुवारी मिरजेच्या कृष्णा नदी घाटावर धुणे धुण्यासाठी सहाजण गेले होते. अचानक पाय घसरून पाच जण पाण्यात बुडाले. ते पाण्यात बुडताना आरडाओरडा सुरू झाला. यावेळी ओम सुरज पाटील या युवकाने तात्काळ पाण्यात उडी मारून तिघांना बाहेर काढले.
दोघेजण लांब असल्याने ते पाण्यात बुडाले त्यातील रामस्वरूप यादव (वय २३), जितेंद्र यादव (२१, रा. जयपूर) हे दोघे बुडाले. बुडालेल्या दोघांना शोधण्यासाठी आयुष्य सेवाभावी संस्था, वजीर रेस्क्यू टीम औरवाड, अग्निशमन दल मिरज यांना पाचारण करण्यात आले.
सकाळपासून शोध कार्य सुरू होते. दुपारी रामस्वरूप यादव याचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले. महात्मा गांधी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक नितीन कुंभार, पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव, पोलीस हवालदार विनायक जांबरे हे तपास करीत आहेत.