Latest Marathi News

BREAKING NEWS

 

देशसेवा करत असताना वडील शहीद झाले पण २९ दिवसांचा चिमुकला मात्र झाला पोरका…

0 426


जम्मूकाश्मीर : दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्करातील एक कर्नल, मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे उपअधीक्षक शहीद झाले. तर दोन जवान बेपत्ता आहेत. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरले असून अद्याप शोध मोहीम सुरू आहे. लष्कर पदक विजेते कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि पोलीस उपअधीक्षक हुमांयू भट अशी तीन शहीद जवानांची नावे आहेत. चकमकीत तिघेही गंभीर जखमी झाले आणि नंतर उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.

 


या हल्ल्याची जबाबदारी लष्कर फ्रंटने (TRF) स्वीकारली आहे. कर्नल मनप्रीत हे मोहालीतील भदौजिया गावचे रहिवासी होते, मेजर आशिष पानिपतच्या सेक्टर 7 मध्ये राहत होते आणि डीएसपी हुमांयू पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे रहिवासी होते. माहितीनुसार, कोकरनागच्या गड्डल जंगल परिसरात दहशतवादी असल्याचे समजले. मंगळवारी संध्याकाळी लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या १९ राष्ट्रीय रायफल्स (आरआर) च्या संयुक्त दलाने शोध मोहीम सुरू केली. परिसरात रात्रीची कारवाई थांबवल्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा दहशतवाद्यांचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली.


आरआर सीओ कर्नल मनप्रीत यांनी टीमचे नेतृत्व करत दहशतवाद्यांवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात कर्नल, मेजर आणि डीएसपी गंभीर जखमी झाले. तिघांनाही एअरलिफ्ट करून श्रीनगरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. श्रीनगरच्या जिल्हा पोलीस लाईनमध्ये हुमांयू भट यांना पूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पुष्पचक्र अर्पण केले.


यादरम्यान माजी आयजीपी गुलाम हसन भट यांनीही त्यांचे शहीद पुत्र डीएसपी हुमांयू भट यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी हुमांयू भट यांची पत्नी फातिमा यांनी पतीचा तिरंग्यात गुंडाळलेला मृतदेह पाहून टाहो फोडला. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. शहीद डीएसपी हुमांयू भट यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. शहीद डीएसपींच्या अंत्यदर्शनासाठी तरुण, वृद्ध, सर्वजण आले होते.


शहीद डीएसपी हुमांयू भट यांच्या पश्चात पत्नी आणि २९ दिवसांचा मुलगा आहे. डीएसपी हुमांयू भट यांचे कुटुंब दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे रहिवासी आहे. खूप दिवसांपासून ते इथे वास्तव्यास आहेत. शहीद डीएसपी हुमांयू यांचे सुमारे एक वर्षापूर्वी लग्न झाले असून त्यांना २९ दिवसांचे एक बाळ आहे. ते २०१९ च्या बॅचचे अधिकारी होते. हुमांयूचे वडील गुलाम हसन भट हे माजी डीआयजी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.