सुक्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतेत असल्याने सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केली सरकारकडे मागणी! शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
मुंबई/अहमदनगर : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे येणाऱ्या काळात दुष्काळाचे संकट घोगावू लागले आहे. जूनपासून आजवर १०२ दिवसांत सरासरी ३० दिवसच पाऊस मराठवाड्यात बरसला असून ७ सप्टेंबरपासून पुनरागमन केलेल्या पावसानेदेखील दोन दिवसांपासून काढता पाय घेतला आहे. गेल्या ५ दिवसांत थोडाच व काही ठिकाणीच पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. सोयाबिन, तूर, ज्वारीसह फळबागाही पाण्याअभावी जळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे, शासनाने दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केली आहे.
राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने ऐन फुलोऱ्यातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून, सोयाबीनच्या उत्पादनात सरासरीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सोयाबीनची राज्यात सर्वात जास्त क्षेत्रावर लागवड झाली असून, भात पिकालाही पावसाच्या खंडाचा फटाका बसला आहे. भाताच्या उत्पादकतेतही १३ टक्क्यांची घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते सोयाबीनच्या उत्पादनात ही घट किमान १५ ते २० टक्के व कापूस पिकात किमान ५ ते १० टक्के घट येऊ शकते.
जूनपासून ३ महिने झालं पाऊस नाही, पहिल्यांदाच असं घडतंय. खरिपाच्या पेरण्याही गेल्या. त्यामुळे, सरकारने तुमचा पक्ष आणि पार्ट्या काय करायचंय ते करावं, पण शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. तसेच, हे मानवतेला धरुन योग्य असल्याचंही अण्णांनी म्हटलं. सरकार आणि विरोधकांनी बसून विचार केला पाहिजे, दोघांनी समन्वयाने शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घ्यावा, असेही अण्णांनी मीडियाशी बोलताना म्हटले.