मजेशीर: पोलीस हवालदाराने वरिष्ठ अधिकाऱ्याला रजेसाठी लिहलेला एक भन्नाट अर्ज सोशल मीडियावर होतोय व्हायरल…
सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील एका पोलीस हवालदाराने लिहिलेला रजेचा अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हवालदाराने हा अर्ज त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लिहिला आहे. ज्यामध्ये त्याने पाच दिवसांची रजा मागितली आहे. मात्र, रजेसाठी त्याने जे कारण या अर्जात लिहिलं आहे, ते मजेशीर आणि तितकचे आश्चर्यकारक आहे. हवालदाराच्या या अर्जावर सीओ सिटीने पाच दिवसांची रजा देखील मंजूर केली आहे. मात्र हवालदाराने लिहिलेला अर्ज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील आहे. येथील कादरीगेट पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले हवालदार राघव चतुर्वेदी यांनी सीओ सिटीकडे पाच दिवसांच्या रजेसाठी अर्ज केला होता. अर्जात हवालदाराने लग्नासाठी मुलगी बघायला जाण्यासाठी सुट्टी मागितली आहे. हवालदाराने रजेच्या अर्जात लिहिले आहे.
“माझ्या वडिलांनी फोनवरुन कळवले आहे की ते माझ्यासाठी मुलगी बघायला जाणार आहेत. मला पोलिसात नोकरीला लागून तीन वर्षे झाली असून अद्याप माझे लग्न झालेले नाही. शिवाय पोलीस मुलांसाठी लग्नाचे प्रस्तावही जास्त येत नाहीत. खूप दिवसांनी एक चांगले स्थळ आले आहे. आता माझे लग्नाचे वय देखील निघून जात आहे. त्यामुळे कृपया मला पाच दिवसांची रजा द्यावी ही विनंती आहे. सर, तुमचे खूप उपकार होतील”