माणदेश एक्सप्रेस न्युज : जालना : मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने चर्चा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांबाबत आजच आदेश काढण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने मनोज जरांगे-पाटील हे उपोषण मागे घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या मराठा समाजातील लोकांकडे निजामकालीन कुणबीच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्यांच्याकडे कुणबीच्या नोंदीचे पुरावे आहेत, त्या सर्वांना यापुढे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले.
मंत्रिमंडळात घेतलेल्या या दोन निर्णयांवर आज जीआर काढणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. याची माहिती उपोषणकर्ते मनोज जरांगेंना माजी मंत्री खोतकर आणि टोपे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणांवर आज गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्णय घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. यामुळे आज ते आपला उपोषण मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.