माणदेश एक्सप्रेस न्युज : जालना : मराठा आरक्षणा बाबत, ‘मराठा आरक्षणा’ साठी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांबाबत आजच आदेश काढण्यात येणार आहेत.
राज्य सरकारचा हा निरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि राजेश टोपे यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांना दिला. यावर मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वंशावळ नाही, त्यांनाही आरक्षण दिले पाहिजे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावर गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. आता ते काय निर्णय घेणार, याकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या मराठा समाजातील लोकांकडे निजामकालीन कुणबीच्या नोंदी आहेत, त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्यांच्याकडे कुणबीच्या नोंदीचे पुरावे आहेत, त्या सर्वांना यापुढे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले.
मंत्रिमंडळात घेतलेल्या या दोन निर्णयांवर आज रात्रीच जीआर काढणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. याची माहिती उपोषणकर्ते मनोज जरांगेंना माजी मंत्री खोतकर आणि टोपे यांनी दिली. ‘सरकार चार पावले पुढे आले असून जरांगेंनीही सहकार्य करण्याच्या भावनेतून निर्णय घ्यावा’, असे आवाहन खोतकरांनी केले. यावर मराठा ‘समाजातील ज्या लोकांना कुणबीची वंशावळ दाखवता येणार नाही, त्यांनाही प्रमाणपत्र द्यावे’, असे जरांगे यांनी सांगितले. तर मुख्यमंत्र्यांच्या घोषणांवर गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्णय घेणार असल्याची माहिती दिली.