माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील सर्व शिक्षक हे शिक्षक दिनी दिनांक ०५ सप्टेंबर रोजी किरकोळ रजेवर जाणार असून शासनाच्या ध्येय, धोरणा विरुद्ध शिक्षक आक्रमक होत असल्याची माहिती शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संजय कबीर यांनी दिली.
आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक बंधू भगिनी हे 05 सप्टेंबर 2023 रोजी होणारे आंदोलन टप्पा क्रमांक दोन नुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्याकडून करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून शिक्षक दिना दिवशी किरकोळ रजेवर जाणार असून शासनाच्या ध्येय व धोरणा विरोधात रोष व्यक्त व्हावा तसेच प्रत्येक वेळी शासनाकडून प्राथमिक शिक्षकांची गळचेपी व मुस्कटदाबी व मान्यवर व्यक्तीकडून बेछुट आरोप होत आहेत.
तसेच वारंवार होत असलेला अपमान व अशैक्षणिक कामाचा मारा या माध्यमातून होणारा अन्याय त्याची खदखद अखंड महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या मध्ये दिसून येत आहे. ‘आम्हाला फक्त आणि फक्त शिकवू दया’,’विद्यार्थांना शिकू दया’ गोरगरीब मायबाप जनतेची बहुजन समाजातील पोरांना शिकू द्या,महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करूया, या असहकार आंदोलनाची गांभीर्याने शासनाने दखल घ्यावी म्हणून येत्या 05 सप्टेंबर रोजी आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक बंधू भगिनी किरकोळ रजेवर जात असल्याचे संजय कबीर म्हणाले.