माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो. याठिकाणी पर्जन्यमाना पेक्षा कमी पाऊस पडतो. त्यामुळे याचा फायदा या भागामध्ये काम करणारे सरकारी ठेकेदार घेत असल्याने निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. याचाच प्रत्यय आटपाडी बस स्थानक येथे पहावयास मिळत आहे.
गेल्याच महिन्यात बस स्थानकात असणारे सर्व खड्डे मुजवून घेण्यात आले होते. खड्डे मुजवताना योग्य प्रकारे ते मुजवण्यात आले नसल्याने याप्रकरणी आगार प्रमुख यांच्याकडे तोंडी तक्रार देखील करण्यात आली होती. परंतु आपल्या घरचे काम नाही, असाच आविर्भाव आणत अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष करत करत ठेकेदाराचे एकप्रकारे समर्थनच केले.
परंतु याच ठेकेदाराचे केलेले सर्मथन मात्र प्रवाशी वर्गाला भोगावे लागत आहे. बस स्थानक येथे काल रात्री पडलेल्या पावसाने सगळ्या खड्यात पाणीच पाणी साचले अन यातून मार्ग काढताना मात्र प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एस.टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.