माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे. यामध्ये राज्यातून एकूण आठ सदस्यांचा समावेश झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर या चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
मुख्य कार्यकारिणीत ३९ सदस्य असून महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, अशोक चव्हाण, अविनाश पांडे, रजनी पाटील आणि माणिकराव ठाकरे (प्रभारी), चंद्रकांत हंडोरे (कायम निमंत्रित), प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर (विशेष निमंत्रित) या आठ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. बाळासाहेब थोरात यांच्या जागी अशोक चव्हाण यांचा समावेश झाल्यामुळे बाळासाहेब थोरात यांना कोणती जबाबदारी मिळेल, याकडे लक्ष लागले आहे.
चालू वर्षाअखेर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगण, मिझोराम या राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून कार्यकारिणीची रचना करताना सचिन पायलट यांच्यासह राजस्थानच्या ४ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे दिग्विजय सिंह यांच्यासह तीन सदस्यांना स्थान मिळाले, तर छत्तीसगडच्या ताम्रध्वज साहू आणि फुलोदेवी नेताम व तेलंगणच्या दोन नेत्यांना स्थान मिळाले आहे.