Latest Marathi News

BREAKING NEWS

 

वंचितच्या आक्रमकतेमुळे भिडेंचा करगणीतील कार्यक्रम रद्द

0 2,217


माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे दिनांक दि.13 रोजी राममंदिरात संभाजी भिडे यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या प्रखर आक्रमकतेमुळे रद्द करावा लागला.

 


गेले चार दिवस तालुक्यातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. याऊलट पोलिसांनीच वंचितचे साहेबराव चंदनशिवे याना समजपत्र दिले होते. समजपत्रात पोलिसांनी म्हटले होते की, करगणी येथील कार्यक्रम आयोजकांनी व्याख्यान नव्हे तर मिटिंग आयोजित केली असल्याचे म्हटले होते.


करगणी येथील भिडेंच्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मिटिंग आहे असे पोलिसांना लिहून दिले आहे तर मग, आयोजकांनी जाहीर व्याख्यानाचे पोस्टर कसे तयार केले आहे यावरून वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण गढूळ बनले असताना त्यांच्या कार्यक्रमाला पवित्र श्रीराममंदिराच्या सार्वजनिक जागेत परवानगी देऊ नये असे वंचितचे म्हणणे होते.


सकाळपासून तालुक्यातील वंचितचे कार्यकर्ते करगणी येथे जमा होऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर, आणि नरवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रस्त्यावर आले होते.संभाजी भिडे यांचे विरुद्ध घोषणा देत होते.संवेदनशील वातावरण पाहून आटपाडी पोलिसांनी चोख कामगिरी बजावत संभाजी भिडे यांना श्रीराम मंदिरात कार्यक्रम होऊ देण्यास नकार दर्शविला. पोलिसांनी श्रीराममंदिरात कार्यक्रमास परवानगी नाकारल्यानंतर संभाजी भिडे व समर्थकांनी तालुक्यातील तळेवाडीच्या दिशेने ताफा वळवून अज्ञातस्थळी बैठक घेतल्याचे वृत्त आहे.


यावेळी वंचितचे आटपाडी तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे, रविकांत सोहनी, विद्याधर कांबळे, अमित वाघमारे, किरण वाघमारे, रोहन भिसे, मनोज कांबळे, स्वाती सवणे, दीपक सावंत, दीपक चंदनशिवे, अभिजीत खरात, संतोष सावंत, रवींद्र वाघमारे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave A Reply

Your email address will not be published.