माणदेश एक्सप्रेस न्यूज : मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी अवघ्या २० तासांत ‘मंच’ तयार करणारे प्रसिद्ध कला दिग्दर्शक आत्महत्या नितीन चंद्रकांत देसाई यांनी टोकाचे पाऊल उचलत आज सकाळी त्यांच्याच एन.डी. स्टुडिओत आत्महत्या केल्याने सिनेमासृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील हे नक्की झाल्यानंतर नितीन देसाई यांनी अवघ्या २० तासांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवाजी पार्क मैदानावर भव्य असा मंच उभारला होता. छत्रपती शिवरायांची सिंहासनावर बसलेली मूर्ती हे या मंचाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं होतं.
नितीन चंद्रकांत देसाई यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ या आणि अशा अनेक सिनेमांसाठी कला दिग्दर्शन केलं. त्यांना त्यांच्या कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं.
नितीन देसाई यांनी आज आत्महत्या केली. नितीन देसाई यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. कला दिग्दर्शन सारख्या वेगळ्या क्षेत्रात नितीन देसाई यांनी मोलाचं काम केलं आहे. गेल्या ३० वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितीन देसाई यांनी सांभाळली आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी केले आहेत. कला दिग्दर्शन या क्षेत्राला ग्लॅमर मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेल्या नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकाबरोबर काम केले होते. राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकेबरोबरच बालगंधर्व या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती.