माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये सांगली, कराड मार्गे प्रवेश करताना प्रवाशांचे व वाहनधारकांचे स्वागत श्री. हॉस्पिटल ते आटपाडी बसस्थानक या खड्डेमय रस्त्याने होते. मग अंतर्गत म्हणजेच व्यापारी पेठेतील रस्त्यावरून जावयाचे असेल वाहनधारकांना व नागरिकांना आदळत आपटत जावे लागते. त्यानंतर बस स्थानक ते बाजार पटांगण मार्गे ही रस्त्याची हीच अवस्था. तेथून पुढे गेल्यावर कॉलेज पर्यंत अवस्था तर सांगायलाच नको. या मार्गावर दिवसातून एकदा तरी दुचाकी व चारचाकी वाहन चालक यांच्यात हमरी-तुमरी ही ठरलेलीच असते. गेली पाच वर्ष झाले या रस्त्यासाठी निधी नसल्याने शहरातील या प्रमुख अंतर्गत रस्त्याचे प्रश्न अजून कायम आहेत.
राज्यभर जोरदार पाऊस बरसत असला तरी आटपाडी तालुक्यात मात्र पाऊस फारसा नाही. परंतु गेली तीन दिवस चार दिवस सुरु असणाऱ्या रिमझिम पावसामुळे मात्र आहे त्या रस्त्यावर नवीन खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे शहरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेने जाताना दुचाकी अन चारचाकी वाहनधारकांकडे पाहूनच प्रवास करावा लागतो, नाहीतर पाणी अंगावर आले म्हणूनच समजा.
आटपाडी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतमध्ये होवून ही अद्याप पर्यंत शहरातील या अंर्तगत रस्त्यासाठी अजूनही निधी मिळाला नाही. त्यामुळे येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देवून शहरातील अंतर्गत रस्ते असणाऱ्या श्री हॉस्पिटल ते बस स्थानक, बस स्थानक ते बाजार पटांगण व बाजार पटांगण ते आण्णाभाऊ साठे चौक तसेच आटपाडी शहरातील राजारामबापू हायस्कूल ते बाजार पटांगण या मार्गावरील अंतर्गत रस्ते दुरुस्त व्हावेत एवढीच येथील नागरिकांची लोकप्रतिनिधीकडे अपेक्षा.