माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह व वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिंडे यांचा काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून काँग्रेस संभाजी भिडे यांच्या विरुद्ध आक्रमक झाली आहे.
महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. परंतु, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा विषय आज विधानसभेत मांडला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांना कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. भिडे हे अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत.” यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन राज्य सरकारने उचित कारवाई करावी.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. थोरात म्हणाले, “संभाजी भिडे ही एक विकृती आहे. त्यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत अवमानकारण वक्तव्य केलं आहे, जे देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारं आहे. संभाजी भिडे वारंवार अशी वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा शोध घेणं आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहेत.