माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरलेली टेंभू उपसा सिंचन योजना दोन दिवसात चालू होणार असून सदरचो योजना चालू करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला असल्याची माहिती खानपूर विधानसभेचे आमदार अनिल बाबर यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार अनिल बाबर म्हणाले, खानापूर आणि आटपाडी तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्यामुळे या तालुक्यात सिंचनासाठी पाण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यातही पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी शेती पिकांचे विशेषतः ऊस, द्राक्ष आणि डाळिंब पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने टेंभू उपसा जलसिंचन योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याबाबत गुरुवारी, सायंकाळी २० जुलै कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे पार पडली. यांत पुढच्या दोन दिवसात टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार संजय पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, आमदार अरुण लाड, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ आणि जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.