माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी शहराला तसेच आजूबाजूला शेतीला पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या आटपाडी तलावामध्ये मोटर सोडण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक २० रोजी दुपारी ३.०० च्या सुमारास घडली. विलास मारुती गुळदगड (वय ४७) रा. शेवते ता. पंढरपूर, जि. सोलापूर व अनिकेत अमृत विभूते (वय २७) रा. माडगुळे अशी मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माडगुळे ता. आटपाडी येथील शेतकरी अमृत विभूते यांची माडगुळे येथे शेती आहे. या शेतीसाठी आटपाडी तलावातून शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन केली आहे. आज दुपारच्या सुमारास अमृत विभूते यांचा मुलगा अनिकेत विभूते हा त्यांचे शेवते ता. पंढरपूर येथील पाहुणे असलेला विलास मारुती गुळदगड याला घेवून आटपाडी तलावावरती गेला होता.
तलावामध्ये मोटर सोडण्यासाठी अनिकेत व विलास हे दोघे पाण्यात उतरले. परंतु पाण्यामध्ये त्यांना विजेचा शॉक लागला. सदरची माहिती त्या ठिकाणी उपस्थित असलेले तडवळेचे सरपंच जितेंद्र गिड्डे, दादासो मरगळे, सुशील गिड्डे यांना समजताच त्यांनी त्याठिकाणी जावून तलावातील त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु यांचा मृत्यू झाला होता.
सदर घटनेने माहिती कळताच माडगुळे येथील नागरिकांनी आटपाडी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी गर्दी केली होती. सदरच्या दुर्दैवी घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.