माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार अधिकारी वर्ग तीन, श्रेणी दोन व विस्तार अधिकारी वर्ग तीन, श्रेणी तीनची पदे तसेच मुख्याध्यापकांची पदे सुद्धा सेवानिवृत्तीमुळे मोठ्या प्रमाणात रिक्त झाली होती. रिक्त पदांमुळे तालुकास्तरावरील व्यवस्थापन व गुणवत्ता यावर मोठा परिणाम होत होता. याचा विचार करता रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीनुसार विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक यांची समुपदेशनाद्वारे जिल्हा परिषद सांगली कडून पदे भरण्यात आली असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी दिली.
यावेळी बोलताना अमोल माने म्हणाले, शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग तीन श्रेणी दोन ची ०५ पदे व शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग तीन श्रेणी तीन ची ०६ पदे असे एकूण ११ विस्ताराधिकाऱ्यांची रिक्त पदे पदोन्नती द्वारे भरण्यात आली. तसेच ४० मुख्याध्यापकांची रिक्त पदे पदोन्नतीने समुपदेशनाद्वारे भरण्यात आली.
सप्टेंबर २०२२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अंतिम जेष्ठता यादीनुसार यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये पदोन्नती देण्यात आली होती. सदर यादीमध्ये विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक आणखी शिल्लक असल्यामुळे पुन्हा नव्याने रिक्त झालेल्या जागेवर यादीमधील पुढील शिक्षकांना पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली होती. एकाच वर्षात दोन वेळा रिक्त पदावर पदोन्नती देण्याचे काम राज्यात पहिल्यांदाच जिल्हा परिषद सांगली कडून झाले असून शिक्षकांना पदोन्नती पासून वंचित न ठेवता तात्काळ पदोन्नती दिल्याबद्दल शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहन गायकवाड तसेच शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी स्वप्नाली माने,अधीक्षक ज्योती पालकर, कुबेर चौगुले यांच्यासह शिक्षण विभागातील स्टाफचे शिक्षक संघाकडून आभार मानण्यात आले.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे ,खानापूर तालुका अध्यक्ष संजय खरात, शिराळा तालुका अध्यक्ष प्रताप गायकवाड मिरज तालुकाध्यक्ष बाळू गायकवाड यांच्यासह पदोन्नती मिळालेले विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते.