माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडी या गावामध्ये रविवार दिनांक ९ जुलै रोजी गावातील प्रमुख मान्यवरांचा आभार प्रदर्शन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमादरम्यान मुढेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षणाचे काम केलेले प्राथमिक शिक्षक शहाजी वाक्षे यांनी बोलण्याच्या भरात मुढेवाडी गावाबद्दल चुकीची विधाने केल्याने मुढेवाडी गावातील नागरिकांनी याला आक्षेप आहे.
वाक्षेवाडी येथील कार्यक्रमा दरम्यान बोलताना ते म्हणाले, ‘मुढेवाडी गावचा एकही विद्यार्थी पदवीधर नाही असे ते बोलले. परंतु शहाजी वाक्षे यांनी कोणतीही संपूर्ण माहिती न घेता बोलणे म्हणजे ‘उडत्या पाखराची पिसे मोजण्याचा प्रकार’ आहे. कारण ज्या गावाबद्दल शहाजी वाक्षे हे बोलत होते, त्याच गावामध्ये कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाचे धडे दिले आहेत, हे बहुतेक ते विसरले असावे.
शहाजी वाक्षे यांनी मुढेवाडी गावाबद्दल ‘गावामध्ये एकही पदवीधर नाही” हा आरोप सरळ सरळ चुकीचा आहे. कारण मुढेवाडी गाव हे एक लहान असले तरीही आजही कित्येक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एवढंच काय तर ज्यांनी गावाची पताका महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये उज्वल केले ते, मराठी सिनेमा क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे दिग्दर्शक, लेखक, भिमराव मुढे हे ही मुढेवाडीचे आहेत. त्यांनी त्यांच्या उज्जवल किर्तीतून नाव मिळवले आहे. आजही या गावामध्ये करनिर्धार अधिकारी, इंजिनीअर, पत्रकार, तर काहीजण पदवीधर होऊन पुढे शिक्षण घेत आहेत. तर काहीजण गावच्या विकासाच्या मार्गाने चालले आहेत.
खरे तर शहाजी वाक्षे हे वाक्षेवाडी येथील शाळा समिती मध्ये असून, स्वतःच्या गावाचा विकास करायचं सोडून दुसऱ्याच्या गावाबद्दल चर्चा करायला ते काय शिक्षणाधिकारी आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित होत असून या प्रकरणी शहाजी वाक्षे यांनी माफी मागावी अशी मागणी मुढेवाडी ग्रामस्थांनी केली असून यापुढे कोणत्याही माहितीचा पाठपुरवठा केल्याशिवाय बोलू नये असे मुढेवाडी ग्रामस्थांनी आवाहन देखील केले आहे.