माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी दि. ११ : ‘तराळ अंतराळ’ कार साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या 101 व्या जयंती निमित्त येथे आटपाडी येथे आज दिनांक ११ रोजी एकदिवसीय साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलास खरात यांनी दिली.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आहेत. आटपाडी शहरातील तांबडा मारुती मंदिरात साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. सकाळी १०:३० वाजता डॉ. शंकरराव खरात यांचे प्रतिमेचे पुजन,अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर “डॉ. शंकरराव खरात कार्य आणि कर्तृत्व” यावर परिसंवाद आयोजित केला आहे.
परिसंवादाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते प्रा. डॉ. कृष्णा इंगोले, प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी, सुभाष कवडे, बा.ना. धांडोरे (पंढरपूर) आहेत. दुसरे सत्र कवि संमेलनाचे होणार आहे. कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानेश डोंगरे आहेत. तर मुख्य सूत्रसंचालक सुनिल दबडे करणार आहेत.
या साहित्य संमेलनामध्ये आटपाडी, सांगोला, माण, खटाव, पंढरपूर, जत या भागातून नामवंत लेखक कवी सहभागी होणार आहेत. साहित्य प्रेमींना हे साहित्य संमेलन सहभाग नोंदवून उपस्थित राहण्याचे आवाहन विलास खरात यांनी केले.