अन्यथा पुन्हा सूतगिरणी सभासदांच्या नावावर करण्याचे प्रयत्न करणार : तानाजीराव पाटील यांचा देशमुख गटाला सूचक इशारा
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : सभासदांच्या मालकीची असणारी श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी ही तुम्ही जिल्हा बँकेची सत्ता असताना प्रायव्हेट लिमिटेड करून स्वत:च्या ताब्यात घेतली. त्या ठिकाणी असणाऱ्या जागेची तुम्ही प्लॉट पडून विक्री करून पाप केले.
आम्ही माणगंगा सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीला असल्याने तो पुन्हा जिल्हा बँकेकडून माणगंगा सहकारी संस्थेच्या ताब्यात घेतला आहे. जर साखर कारखाना सुरु करण्याच्या बाबतीत तुम्ही तक्रारी करत असला तर, सभासदांच्या मालकीची असणारी श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी ही प्रायव्हेट लिमिटेड केली असली तरी, ती पुन्हा सभासदांच्या मालकीची करण्यासाठी प्रयन्त करणार असल्र्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी केले असून तसा सूचक इशारा त्यांनी देशमुख गटाला दिला आहे.
पुढे बोलताना तानाजीराव पाटील म्हणाले, गेली पाच वर्ष कारखाना हा बंद होता. त्यावेळी तुम्ही जिल्हा बँकेच्या सत्तेत होता. त्यावेळी कारखाना का सुरु केला नाही? असा सवाल देखील त्यांनी केला. शेतकरी, कामगार यांच्या हट्टापायी मी साखर कारखाना निवडणुकीमध्ये पॅनेल उभे केले. मी साखर कारखाना सुरु करणार हा शब्द सभासदांना, शेतकरी, कामगार वर्गाला दिल्याने तुम्ही सत्ताधारी असताना देखील आमच्या पॅनेलवर विश्वास टाकून कारखाना तुम्हीच आमच्या ताब्यात दिला आहे.
त्यामुळे आम्ही साखर कारखाना दोन महिन्यात सुरु करणार असून याबाबत देशमुख गटाने कारखान्या बाबत तक्रार करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.