माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : अजित पवारांसह राष्ट्रवादीतील नऊ आमदार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाची आज मुंबईत बैठक आहे. दोन्ही गट बैठकांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या दोन्ही बैठकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार मुंबईकडे रवाना झाले आहे.
या बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांनी अंधारात ठेवून काही आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याचा, दिशाभूल केल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कोणासोबत किती संख्याबळ याचा नेमका खुलासा आजच्या बैठकांमध्ये होण्याची शक्यता आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार गटाची तर भुजबळ नॉलेज सिटीत अजित पवार गटाची बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंच्या प्रतोदांनी व्हीपही बजावला आहे अनेक आमदार काल (मंगळवारी) रात्रीच मुंबईत आले आहेत. अखेरपर्यंत पळवापळवीचे प्रयत्न सुरू असल्याने त्यांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले असल्याची माहिती आहे.
राष्ट्रावादी कॉंग्रेस मध्ये अजित पवारांनी सकाळी 11 वाजता कार्यकर्त्यांची, आमदारांची बैठक बोलावली आहे. तर शरद पवार यांनी दुपारी 1 वाजता वाय बी चव्हाण सेंटर वर बैठक बोलावली आहे. दोन्ही गटाकडून आपल्यासोबत आमदार असल्याचा दावा केला जात आहे.