माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, हेच आमची खरी राष्ट्रवादी काँग्रेस असून भविष्यात पवार – पाटील यांच्याच पाठीशी ठामपणे उभे रहात राष्ट्रवादी काँग्रेस शक्तीशाल करणार असल्याचा वज्रनिर्धार आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यानी व्यक्त केला.
शासकीय विश्रामगृह आटपाडी येथे आज संपन्न झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत हा वज्रनिर्धार सर्वांनी बोलुन दाखविला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील, आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, ज्येष्ट नेते विष्णुपंत चव्हाण पाटील, राष्ट्रवादीचे तालुक्याचे नेते प्रभाकर नांगरे – पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुरज पाटील, महिला राष्ट्रवादी च्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
चोहोबाजूनी अपयश येवू लागल्याने, विरोधकांचे खच्चीकरण करण्याचे हेतूने सीबीआय, ईडी सारख्या तपास यंत्रणाचा गैरवापर सुरू आहे . भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या सर्वाना भाजपाने त्यांच्याजवळ गेल्यावर क्लिनचीट देत स्वच्छ बनविले ही दुटप्पी भावना जनता ओळखून आहे . मताच्या फटकार्या्तून जनता भाजपाला नेस्तनाबुत केल्या शिवाय राहणार नाही . शरद पवार, जयंत पाटील साहेबांच्या विचारानेच या भागाने सदैव वाटचाल केली आहे. यापुढेही आम्ही सर्वजण पवार – पाटील यांचेच समर्थक म्हणून काम करू असे सुतोवाच हणमंतराव देशमुख यांनी केले.
महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा स्वाभीमान , अस्मिता दुखावली जाते आहे . आपल्यावर अन्याय होतोय, हे लक्षात येताच देशभर प्रचंड सत्तेतल्या काँग्रेस विरोधात बंड करण्याचे काम शरद पवार यांनी त्याकाळी केले . हे वास्तव नव्या पीढीला माहीत नाही. पवारांचे बंड आणि आजच्या नेत्यांच्या फाटाफुटीत जमीन अस्मानाचा फरक असल्याचे स्पष्ट करून रावसाहेबकाका पाटील यांनी, मोदी शहांच्या ९ वर्षाच्या सत्तेत अनेक विरोधी पक्ष फोडून भाजपाला सत्तेत आणण्याचे पाप केले गेले आहे . तपास यंत्रणांच्या माध्यमातून खोट्या केसेस घालून, प्रसंगी धमक्या देवून, चौकशांचे फार्स करीत, कथित भ्रष्टाचाराचा बागुलबुवा उभा करीत, अनेक पक्ष फोडले गेले . केवळ अन केवळ सत्तेच्या असूरी महत्वकांक्षेतून हा प्रकार घडविणाऱ्या भाजपाला, भाजपाच्या कटकारस्थानाला बळी पडलेल्या सर्वाना जनता मातीमोल करणार आहे. हे येत्या काही महिन्यात दिसून येईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
वयाच्या ८४ व्या वर्षात यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थानी नतमस्तक होत, गत नऊ वर्षापासून देशात, राज्यात लोकशाही व्यवस्था उखडून भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आणण्यास सरसावलेल्या शक्ती विरोधात राज्य – देशभर झंझावाती आवाज उठविण्याचा निर्धार व वाटचाल सुरू करणाऱ्या शरद पवार नावच्या सदाबहार, चिरतरुणाचे आश्चर्यच वाटत असल्याचे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी देशातल्या सर्वच राजकीय पक्षात आदरणीय व्यक्तीमत्व म्हणून शरद पवार साहेबांना मोठे स्थान आहे . देशात आणि राज्यात भाजपा प्रचंड बहुमताने सत्तेतून पायउतार होणार आहे . हे वास्तव मोदी – शहांच्या लक्षात आल्याने तपास यंत्रणाचा गैरवापरातून अनेकांना नाहक हतबल बनविले जात आहे अशा आणिबाणीच्या कठीण प्रसंगी शरद पवार हेच समर्थ पर्याय म्हणून भाजपाविरोधकात मान्य होणार असल्याच्या धसक्यातून काल राष्ट्रवादीत फुट पाडली गेली आहे . गत काही दिवसापर्यत भ्रष्ट असणारी राष्ट्रवादी आणि त्यांची नेतेमंडळी भाजपाच्या सत्तेत सहभागी होताना ती पवित्र कशी झाली . हे खरे आश्चर्य आहे. यातून भाजपा सर्वात भ्रष्ट आणि सर्वत्र दारुण अपयशी ठरलेला पक्ष असल्याचे देशवाशीयांनी ठाणले असून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीत भाजपा दारुण पराभूत होणार आहे. प्रत्येक मराठी मानसाने, राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात प्रचंड मेहनत घेत भाजपाच्या पराभवाचे वास्तव सत्यात आणण्यासाठी झोकून दिले पाहीजे, अशा भावना सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या. यावेळी अनेकांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या समर्थनाच्या भूमिका मांडल्या.